मुंबईत मिठाचा तुटवडा

करोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊनचे दिवस जसेजसे वाढत आहेत तसा मुंबईमध्ये किराणा मालाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच मुंबईच्या अनेक भागांमध्ये सध्या पॅकबंद मिठाचा तुटवडा भासत आहे. मध्य आणि दक्षिण मुंबईतील बहुतांश किराणा दुकानांमध्ये दोन दिवसांपासून मीठ नसल्याचे चित्र आहे. घाऊक विक्रेत्यांकडे साठा आहे. मात्र मालाची चढउतार आणि ने-आण करण्यासाठी कामगार नसल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे विक्रेते सांगत आहेत.


देशभरात २४ मार्च मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंलबजावणी करण्यात आली. त्याआधी अनेकांच्या घरात काही दिवस पुरेल इतके अन्नधान्य होते, तर काही जणांनी नंतर तजवीज केली. महिनाभर पुरेल इतका साठा करण्यात आला. मात्र अनेकांना मिठाचा विसर पडला. लॉकडाऊनच्या १३-१४ दिवसांच्या कालावधीनंतर लोकांना मिठाची आठवण झाली. तोवर सर्वजण अन्नधान्याची साठवणूक करण्यासाठी हातघाईला आले होते. घरातील मिठाचा डबा जसजसा रिकामा होऊ लागला, तसतसे दुकानांमध्ये मिठाची मागणी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढू लागली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मध्य मुंबई, दक्षिण मुंबई तसेच मुंबईच्या इतर काही भागांमध्ये पॅकबंद मीठ संपले आहे. नामांकित कंपन्यांऐवजी कधी बाजारात न पाहिलेल्या कंपन्यांचे मीठ दुकानदार पुढे करीत आहेत. ताडदेवसारख्या काही भागात तर सुटे जाडे मीठ लोकांना घ्यावे लागत आहे. माल येत नसल्याने मिठाची टंचाई असल्याचे विक्रेते सांगत आहे.