मास्कविक्रीच्या बहाण्याने फसवणूक

करोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी वापरण्यात येणारे मास्क व इतर वैयक्तिक सुरक्षा उपकरणांच्या मागणीत वाढ झाल्याची संधी साधून या वस्तूंच्या विक्रीच्या बहाण्याने टोळीने ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. या टोळीने देशभरातील विविध सरकारी व खासगी रुग्णालयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. एन-९५ मास्क व वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या तळोजा एमआयडीसीतील कंपनीच्या नावाने ही फसवणूक सुरू केल्याचे आढळून आले. त्यामुळे तळोजा पोलिसांनी या टोळीचा माग काढण्यास सुरुवात केली. या टोळीने अशाच पद्धतीने देशभरातील अनेक सरकारी व खासगी रुग्णालयांची फसवणूक केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क व इतर वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा वापर करण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण देशात सरकारी व खासगी रुग्णालये तसेच नागरिकांमधून एन-९५ मास्कसह सॅनिटायझर व इतर सुरक्षा उपकरणांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. याचाच फायदा उचलत ऑनलाइन गंडा घालणाऱ्या एका टोळीने एन-९५ मास्क व वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या तळोजा एमआयडीसीतील व्हिनस सेफ्टी प्रा. लि. या कंपनीमार्फत एन-९५ मास्क व वैयक्तिक सुरक्षा उपकरणांची ऑनलाइन विक्री करण्यात येत असल्याचे भासवून देशभरातील सरकारी व खासगी रुग्णालये व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना परस्पर संपर्क साधण्यास सुरुवात केली.

एखाद्या रुग्णालयाने मास्क व इतर वैयक्तिक सुरक्षा उपकरणे व साहित्याची खरेदी करण्याची तयारी दर्शविल्यास अशा रुग्णालयांना या टोळीतील सदस्य बँकेचे खाते क्रमांक देऊन त्यात ऑनलाइन पैसे जमा करण्यास सांगतात. त्यानंतर ही टोळी त्यांना साहित्य न पाठविता त्यांची फसवणूक करते. या टोळीने २ एप्रिल रोजी वॉल्टर जॉन या व्यक्तीकडून ७ हजार ५०० रुपये स्वीकारले होते, मात्र त्यांना मास्क व इतर साहित्य न मिळाल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी तळोजा येथील व्हिनस सेफ्टी कंपनीला संपर्क साधल्यानंतर फसवणुकीचा प्रकार निदर्शनास आला.