भोपाळ: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते शिवराजसिंह चौहान आज शपथ घेण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन हे शिवराजसिंह चौहान यांना आज संध्याकाळी ७ वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भोपाळमध्ये आज संध्याकाळी ६ वाजता भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची बैठक होईल. त्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल. मुख्यमंत्रिपदासाठी शिवराजसिंह चौहान यांचे नाव आघाडीवर असून मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी नरेंद्रसिंह तोमर यांच्या नावाची देखील चर्चा आहे. मात्र, असे असले तरी देखील शिवराजसिंह चौहान हेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनतील हे जवळजवळ निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पडल्यानंतर भारतीय जनता पक्ष नवे सरकार स्थापन करण्याच्या तयारीला लागला आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचीही माहिती आहे. या बरोबरच भोपाळमध्ये होणाऱ्या आमदारांच्या बैठकीनंतर सर्वकाही ठरल्याप्रमाणे झाल्यास मध्य प्रदेशात नव्या सरकारचे शपथग्रहण आजच होईल.
राज्यसभा निवडणुकीपूर्वीच मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असल्याचेही सांगितले जात आहे. राज्यसभेची निवडणूक २६ मार्चला होणार आहे.
शिवराजसिंह चौहान आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता